महत्वाच्या निधन वार्ता

पंजाबचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचे निधन

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी निधन झाले.

त्यांना श्वसनासंबंधी तक्रारीवरून रविवारी मोहालीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

प्रकाश सिंग बादल यांनी पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

प्रकाश सिंग बादल १९४७ पासून राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सरपंचपदापासून सुरुवात झाली. ते पहिल्यांदा १९५७ साली विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.

त्यानंतर १९६९ मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. ते पहिल्यांदा १९७० साली मुख्यमंत्री झाले. त्यांना एकूण ५ वेळा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता.

गतवर्षी वयाच्या ९४ व्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात लांबी मतदारसंघातून उतरलेले प्रकाश सिंग बादल हे देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार ठरले होते.

राजकीय प्रवास:
शिरोमणी अकाली दलाकडून 1957 मध्ये ते पहिल्यांदा पंजाब विधानसभेवर निवडून आले.

1969 मध्ये पुन्हा निवडून आले आणि तत्कालीन पंजाब सरकारमध्ये समुदाय विकास, पंचायती राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रीपद भूषवले.

ते एकूण 10 वेळा विधानसभेवर निवडून गेले. 1972, 1980 आणि 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते.

1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री झाले आणि त्यांनी कृषी आणि सिंचन मंत्री म्हणून काम केले.

मार्च 1970 मध्ये बादल पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अकाली दल-संत फतेह सिंग आणि जनसंघ यांच्या युती सरकारचे नेतृत्व केले.

2007 च्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत, शिरोमणी अकाली दल-भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारने 117 पैकी 67 जागा जिंकल्या आणि प्रकाश सिंग बादल यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

पंजाबच्या राजकारणातील दिग्गज बादल यांच्या नेतृत्वाखाली 2012 च्या विधानसभा निवडणुका जिंकून शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले.