महत्वाचे अहवाल व निर्देशांक

जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात भारताची 16 स्थानांची आघाडी

जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) २०२३ अर्थात या वर्षांतील वस्तूपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापनातील कामगिरी निर्देशांकात भारताने १३९ देशांत ३८ वा क्रमांक मिळविला आहे.

तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांत मोठी गुंतवणूक केल्याचा परिणाम म्हणून या यादीत २०१८ मध्ये ४४ व्या क्रमांकावर असलेल्या भारताने यंदा त्याहून वरचे स्थान मिळविले. 

२०१४ मध्ये या यादीत भारत ५४ व्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत आता भारताने या क्षेत्रात विकासाची मोठी मजल मारली आहे.

जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, पायाभूत सुविधांच्या गुणांकनात भारताचा क्रमांक २०१८ मधील ५२ व्या क्रमांकावरून २०२३ मध्ये ४७ व्या क्रमांकापर्यंत सुधारला आहे.

आंतरराष्ट्रीय नौकांतून होणाऱ्या माल वाहतुकीच्या बाबतीत २०१८ मध्ये ४४ व्या क्रमांकावर असलेल्या भारताची कामगिरी २०२३ मध्ये २२ व्या क्रमांकापर्यंत सुधारली आहे.

लॉजिस्टिक क्षमता आणि समानता याबाबत भारताची कामगिरी चार स्थानांनी सुधारल्याने यंदा ४८ वा क्रमांक मिळाला आहे.